
७३ उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ; पारदर्शकतेने निवड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
गडचिरोली : शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमानुसार आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष अनुकंपा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात २८६ उमेदवारांच्या प्रतीक्षेतून ७३ उमेदवारांनी सहभाग घेतला. या सर्वांना त्यांच्या पसंतीनुसार तीन विभागांची नावे अर्ज भरून देण्यास सांगण्यात आले.
या मेळाव्यासाठी विविध १३ विभागांकडून एकूण ५३ पदांची मागणी प्राप्त झाली होती, त्यापैकी प्राथमिक टप्प्यात ४३ पदे अंतिम करण्यात आली आहेत. याच पदांवर लवकरच नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पडताळणी तसेच शारीरिक तपासणीही करण्यात आली. या मेळाव्यासाठी १५ नियुक्ती अधिकारी कार्यालयांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने राबविली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, आस्थापना शाखेचे तहसीलदार संजय जयस्वाल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.



