गडचिरोलीविदर्भ

सिरोंचा-अंकिसा परिसर दोन दिवसांपासून अंधारात, नागरिक संतप्त

वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा-अंकिसा परिसर गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे अंधारात असून, यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. आधीच विविध असुविधांचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेचे दैनंदिन जीवन वीजपुरवठ्याअभावी विस्कळीत झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनुसार, या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत आहेत. पावसामुळे तांत्रिक अडचणी वाढल्या असल्या तरी, दोन दिवसांपासून विजेचा मागमूसही नाही. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, लहान मुले आणि व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. “आज ५जीचा काळ आहे, पण आम्हाला १९९० च्या दशकात ढकलले आहे,” असे एका स्थानिक नागरिकाने म्हटले.

आलापल्ली ते सिरोंचा या ८० किमीच्या घनदाट जंगल पट्ट्यात वीजपुरवठ्यात अडचण येत नाही, मात्र फक्त ५ किमीच्या सिरोंचा-आंकिसा जंगल पट्ट्यात वारंवार ब्रेकडाउन होतो, यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

नागरिकांच्या मते, पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांच्या मार्गातील झाडांची छाटणी (ट्री कटिंग) करणे आवश्यक असते, ज्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होतो. परंतु, यंदा हे काम वेळेत न झाल्यामुळेच पावसाळ्यात फांद्या तारांवर आदळून ब्रेकडाउनची समस्या वाढली आहे. “ट्री कटिंगसाठीचा निधी गेला कुठे?” असा सवालही नागरिक विचारत आहेत.

स्थानिकांनी महावितरण विभाग आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर १० दिवसांच्या आत ही समस्या मार्गी लावली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button