
नियमांचे उल्लंघन केल्याने कृषी विभागाची कठोर कारवाई
भंडारा : जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळल्याने कृषी विभागाने ९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत, तर दोन कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. २८ ऑगस्ट रोजी या कारवाईचे आदेश पारित करण्यात आले.
शेतकऱ्यांना अनुदानित खतांची विक्री ‘पॉस मशीन’द्वारे करणे बंधनकारक असतानाही काही कृषी केंद्रांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. याशिवाय, शेतकऱ्यांना पक्के बिल न देणे, परवाना दुकानात दर्शनी भागात न लावणे आणि खतांच्या साठ्याची नोंद अद्ययावत न ठेवणे यांसारखे गैरव्यवहारही आढळले. जास्त दराने खत विकणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी अशा केंद्रांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
अग्रवाल कृषी केंद्र, देवसर्रा, तुमसर व गुप्ता कृषी केंद्र, भुयार, पवनी या दोन कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. दि. नाकडोंगरी कॉपरेटिव्ह राईस मिल, नाकाडोंगरी या केंद्राचा परवाना ९० दिवसांसाठी, शिव कृषी केंद्र, चुल्हाड (१५ दिवस), साहिल कृषी केंद्र, गोबरवाही (१५ दिवस), देवराम कृषी केंद्र, धानोड (९० दिवस), शुभम कृषी केंद्र, सांबा (१५ दिवस), प्रेमपुष्पा कृषी केंद्र, वालमाझरी (१५ दिवस), बारई ट्रेडर्स, कांद्री (६० दिवस), कृषीयोग कृषी केंद्र, सिहोरा (४५ दिवस), कारेमोरे कृषी केंद्र, शहापूर केंद्राचा परवाना १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
या निलंबनाच्या कालावधीत या कृषी केंद्रांना खतांची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांनी दिली आहे.



