
गोंदिया : गोंदिया शहरात अमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश लावण्यासाठी रामनगर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत एका १६ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला मेफेड्रॉन (एम.डी.) पावडरसह रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी अमली पदार्थांसह मोटारसायकल आणि इतर साहित्य मिळून एकूण ३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मालधक्का परिसरात पाळत ठेवली. त्यावेळी आरोपी अरमान अफरोज खान-पटेल (१९) आणि जुन्या लक्ष्मीनगर येथील १६ वर्षीय विधी संघर्षित बालक एका मोटारसायकलवर बसलेले आढळले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, अरमान खान मोटारसायकलवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, १६ वर्षीय बालक पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून ९.१ ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर, ज्याची किंमत १ लाख ८२ हजार रुपये आहे, ती जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त, पोलिसांनी १ लाख २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (क्रमांक MH 35-AT 1140), माचिसची डबी आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी आरोपींवर मादक पदार्थ द्रव्य विरोधी अधिनियम कलम ८ (क) आणि २२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण बोरकुटे, सहायक पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे आणि उपनिरीक्षक अमोल वाघमोडे यांनी केली. फरार झालेल्या अरमान खानचा शोध पोलीस घेत आहेत.



