
आदिवासी गावांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन सज्ज, २ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना फायदा
गडचोली: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत, गडचिरोली येथे ‘आदि कर्मयोगी’ जिल्हास्तरीय प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली येथे ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या तीन दिवसीय ‘डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅब (DPL)’ प्रशिक्षणात आदिवासी भागातील विकासासाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला आहे.
‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ ची सुरुवात २ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. महाराष्ट्रात १६ जून २०२५ रोजी या अभियानाचा प्रचार-प्रसार सुरू करण्यात आला. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधील २१४ तालुके आणि ४,९७५ गावांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आणि ४११ गावांचा समावेश असून, यातून २,००,८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत वैयक्तिक आणि सामूहिक लाभ १०० टक्के पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी रणजीत यादव, कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. या अभियानांतर्गत केंद्र शासनाने १७ विभागांच्या माध्यमातून एकूण २५ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, पंचायत, वन, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण आणि आदिवासी विकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मास्टर ट्रेनर्स नितीन पाटील, योगेश वैद्य, रवी आत्राम, विक्रम सटाले, गजानन भांडेकर, प्रवीण पाटील, अखिल श्रीरामवार आणि माधव मडावी यांनी मोलाचे योगदान दिले. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागांत बहुस्तरीय क्षमता विकास साधून एक उत्तरदायी शासन व्यवस्था उभी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.



