
मुजबीजवळ भीषण अपघात, पती-पत्नी जखमी
भंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मुजबी (बेला) गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार पोलीस कॉन्स्टेबल भरत तुकाराम रामटेके (वय ५५, रा. बेला) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२:५० वाजता घडली.
खरबी (नाका) येथील आदर्श कोल्हटकर (वय ३६), पत्नी किरण कोल्हटकर (वय ३०), मुलगी अधिरा आणि नऊ महिन्यांची चिमुकली असे चौघे आपल्या दुचाकीने (क्र. MH ३६-S ७९९९) भंडाऱ्याहून आपल्या गावाकडे येत होते. त्याचवेळी, बेला येथील रहिवासी आणि गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल भरत रामटेके त्यांच्या दुचाकीने (क्र. MH-३६-Q-३९१५) येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील एका फाट्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात पोलीस कर्मचारी भरत रामटेके यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आदर्श आणि किरण कोल्हटकर हे दोघेही जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे, भरत रामटेके यांच्या निवृत्तीला फक्त तीन वर्षे शिल्लक होती. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद जनबंधू या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



