
गडचिरोली : जिल्हाभरातील तालुका मुख्यालयात मुक्तीपथतर्फे सुरू असलेले व्यसन उपचार क्लिनिक अनेकांच्या सुखी संसारासाठी वरदान ठरत असल्याचे मत रुग्ण व्यक्त करीत आहे. मागील आठवड्यात एकूण 38 रुग्णांनी क्लिनिकतून उपचार घेत व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार केला आहे.
दारूचे व्यसन लागलेल्या व्यक्तीच्या कुटुंबात नेहमी दुःखद वातावरण असते. घरातील कर्ता पुरुष मद्यपी असल्याने दारिद्र्यात महिलांना जीवन जगावे लागते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना करीत जीवन जगावे लागते. एकदा दारूचे व्यसन लागलेले रुग्ण मानसिकरित्या कमकुवत असतात. यातून बाहेर पडण्याकरिता उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व दुर्गम भागातील रुग्णांना मोफत उपचार मिळावे, याकरिता मुक्तीपथने बाराही तालुक्याच्या मुख्यालयात उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या क्लिनिकतून रुग्णांना योग्य समुपदेशन व औषधोपचार करून दारू सोडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. मागील आठवड्यात अहेरी 11, एटापल्ली 10, धानोरा 12, भामरागड 5 अशा एकूण 38 रुग्णांनी उपचार घेत दारू बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याची कबुली दिली.



