गडचिरोलीविदर्भ

ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय ; अहिंसक कृतीतून एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल

घोट येथील ग्रामस्थ एकवटले

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या घोट गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी पोलिस विभाग, मुक्तीपथ, तमूस व दारूबंदी समितीने एकजुटीने ताकद लावली आहे. यासाठी ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेत अहिंसक कृतीतून एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केल्याने सध्यास्थितीत अवैध व्यवसाय बंद आहे.

जिल्ह्यातील घोट हे प्रसिद्ध ठिकाण आहे. जवाहर नवोदय विद्यालयासह शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालय येथे असल्याने  परिसरातील लोकांसाठी हे महत्वाचे ठिकाण आहे. गावात काही अवैध विक्रेते असल्याने दारूचे दुष्परिणाम गावात दिसून येतात. गावातील अवैध दारू बंद करण्याकरिता महिलांनी दारू विक्रत्यांविरोधात मोहीम राबवून अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले होते. पोलिस विभागाने देखील विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यानुसार विक्रीचे प्रमाण कमी झाले पण पूर्णत: विक्री बंद झाली नव्हती दरम्यान, आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्री पूर्णत: थांबवि असा निर्णय घेण्यात आला. सोबतच तंटामुक्त समिती गठित करण्यात आली. दारूबंदी समिती सुद्धा स्थापन करण्यात आली. यासाठी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी शिंदे यांनी ग्रामस्थांना पाठिंबा दर्शविला.

निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता पोलिस, मुक्तीपथ, दारूबंदी समिती व तमूस समितीने संयुक्तरीत्या गावातील संपूर्ण दारू विक्रत्यांविरोधात अहिंसक कृती केली. यावेळी एका विक्रेत्याकडे मिळून आलेली दारू जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. या कृतीमुळे इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून सध्यास्थितीत दारूविक्री बंद आहे. गावात शांततेचे वातावरण आहे. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत बेलगटा व भीमगट्टा येथून अवैध दारूविक्री बंदीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

गाव दारूविक्री मुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी एपीआय किशोर शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष आसिफ शेख, दारूबंदी समिती अध्यक्ष रमेश शृंगारपवार, मुक्तीपथचे आनंद इंगळे, विनोद पांडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, पदाधिकारी व गावातील महिला पुरुषांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button