गडचिरोलीविदर्भ

शंकरराव बेझलवार महाविद्यालयात गॅस सुरक्षेबाबत जनजागृती

अहेरी : स्थानिक शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत गॅस सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सुर्या दास गॅस सेफ्टी प्रा. लिमिटेड, एलपीजी गॅस सुरक्षा विभाग यांच्या सहकार्याने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुर्या दास गॅस कंपनीच्या कार्यकर्त्यांनी एलपीजी म्हणजे काय, गॅस दुर्घटना का घडतात, अशा प्रसंगी सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी, सिलेंडरला लागणाऱ्या आगीपासून होणारे धोके व त्यांचे नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना अधिक समजण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (डेमो) सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आपत्तीसमयी कसे त्वरित पाऊल उचलावे हे प्रत्यक्ष अनुभवातून समजले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माधुरी मोरे, सृजल दुधे, रणजीत खोब्रागडे व प्रशांत गवई सर यांनी गॅस सुरक्षिततेचे विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात अगदी छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास मोठ्या दुर्घटना टाळता येतात, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे महाविद्यालयीन स्तरावर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून शिकलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरावे, ज्यामुळे स्वतःची व समाजाची सुरक्षा सुनिश्चित होईल, असे त्यांनी मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात करण्याची तयारी दर्शविली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मंगला बनसोड यांनी यशस्वीपणे केले. यशस्वी आयोजनाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांत पोटदुखे, तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button