
१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘शेतकरी न्याय हक्क परिषदे’त घेणार सहभाग ; राज्य सरकारवर टीका
गडचिरोली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक १५ सप्टेंबर रोजी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा झाली, तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वडसा तालुक्याचे सचिव कॉम्रेड परसराम आदे होते.
जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “सरकार जनविरोधी कायदे करून शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना लुटत आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक येत असल्याचे सांगत आहेत, पण त्यांच्याच विदर्भात देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हा विकास नसून विनाश आहे.”
संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले १७, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. या परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातून १० प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचेही बैठकीत ठरले.
या बैठकीला तालुका सचिव राजू सातपुते, विठ्ठल प्रधान, किसन राऊत, वासुदेव निखारे, ब्रम्हदास बावणे, बाबुराव मोहुर्लू, भगवान राऊत, सुनिल दुमाने, कविता मेश्राम, प्रमोद कोसेकर हे उपस्थित होते.



