
सिरोंचा तालुक्यातील वेनलाया येथील घटना
सिरोंचा : तालुक्यातील वेनलाया गावात जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींवर अस्वलाने अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमींवर सध्या सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संदीप वेलादी (वय २०) आणि विजय वेलादी (वय ६०) अशी जखमींची नावे आहेत. नेहमीप्रमाणे आपल्या गाई घेऊन ते वेनलाया गावाजवळच्या जंगलात गेले होते. यावेळी अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, गावाकऱ्यांनी त्यांना तातडीने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, अस्वलाने त्यांच्या हात, पाय आणि अंगावर गंभीर जखमा केल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख गणेश बोधणवार यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, जखमींवर तातडीने उपचार व्हावेत आणि त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी. तसेच, वनविभागाने अशा घटना टाळण्यासाठी जंगलात गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.



