क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

दलम कमांडरसह एसीएम दर्जाच्या महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

मोडस्के जंगल परिसरात चकमक ; AK-47, पिस्तूलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळवले आहे. एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गट्टा दलम कमांडर सुमित्रा उर्फ सुनिता वेलादी (वय 38, रा. मडवेली ता. अहेरी) आणि गट्टा दलम एसीएम ललीता उर्फ लड्डो उर्फ संध्या कोरसा (वय 34, रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.)) या दोन वरिष्ठ महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

गट्टा दलमचे नक्षलवादी मोडस्के जंगल परिसरात मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सी-६० कमांडो आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी तत्काळ मोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर, जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या.

गट्टा दलम कमांडर सुमित्रा वेलादी हिच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. तिच्यावर १४ चकमकी, १२ खून, ३ जाळपोळीचे व इतर २ असे ३१ गुन्हे दाखल आहेत. गट्टा दलम एसीएम ललीता कोरसा हिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस होते. ती गट्टा दलमचा डिव्हीसीएम राजू वेलादी याची पत्नी होती. तिच्यावर ८ चकमकी, ४ खून, १ जाळपोळ व इतर १ असे १४ गुन्हे दाखल आहेत. चकमकीनंतर घटनास्थळावरून 01 एके-47 रायफल, 01 अत्याधुनिक पिस्तूल असे एकूण 02 अग्निशस्त्र, जिवंत काडतूस, नक्षली साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. गेल्या २०२१ पासून गडचिरोली पोलिसांनी एकूण ९३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून, १३० जणांना अटक केली आहे, तर ७५ जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट 191 बटा. सिआरपीएफ सत्य प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात सी-60, पोस्टे गट्टा (जां.) आणि सिआरपीएफच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button