
कोरचीच्या लेकुरबोडी जंगलात आढळले स्फोटके आणि विध्वंसक साहित्य
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला आहे. कोरची तालुक्यातील लेकुरबोडी जंगल परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली असून, यात स्फोटक पावडर, लोखंडी सिल्व्हटर आणि क्लेमोरसह इतर साहित्य मिळाले आहे.
गडचिरोली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, लेकुरबोडी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मागील वर्षापासून स्फोटक साहित्य लपवून ठेवले आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर रोजी विशेष अभियान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाची (BDDS) टीम तपासणीसाठी रवाना झाली.
१६ सप्टेंबर रोजी शोधमोहिमेदरम्यान पथकाला जंगलात एक संशयास्पद ठिकाण सापडले. तपासणी केली असता, त्याठिकाणी ०१ नग ०५ लिटरचा स्टिलचा डब्बा, १.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धार लावलेले लोखंडी सिंलटर, ०४ नग क्लेमोर व ०८ नग इलेक्ट्रीक वायर बंडल मिळून आले. सुरक्षिततेची योग्य काळजी घेत पोलीस पथकाकडून घटनास्थळावर मिळून आलेले सर्व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे मोठे घातपाती मनसुबे उधळले गेले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विअप गडचिरोलीचे पोउपनि. प्रसाद पवार, पोउपनि. निखिल धोबे, बिडीडीएस गडचिरोलीचे पोउपनि. गणेश यलमर-पाटील सोबतच विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कामगिरीबद्दल सर्व अधिकारी आणि जवानांचे कौतुक केले आहे. या परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आले असून, नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.



