गडचिरोलीविदर्भ

डॉ. प्रणय खुणे ‘पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड २०२५’ पुरस्काराने सन्मानित

गडचिरोली : जिल्ह्यासाठी अभिमानास्पद घटना घडली असून, येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांना ‘पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. वर्धिनी वेलनेस फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कुरखेडा तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. प्रणय खुणे हे एक प्रतिष्ठित उद्योगपती, समाजसेवक, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले अतुलनीय कार्य आणि नक्षलग्रस्त भागात सामाजिक न्यायासाठी घेतलेले परिश्रम या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. खुणे यांनी आतापर्यंत नक्षल प्रभावित व अतिसंवेदनशील जंगलव्याप्त भागात ८०० किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचे रस्ते व पुलिया निर्माण करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आहे. या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमुळे दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे.

यासोबतच, ते आजही नक्षलग्रस्त व अतिशय जंगलग्रस्त भागात स्वतः भेट देऊन तेथील गोरगरीब, शोषित आणि वंचितांच्या समस्या जाणून घेतात. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील व कार्यरत आहेत. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेमुळेच त्यांना या सन्मानासाठी निवडण्यात आले.

डॉ. प्रणय खुणे यांना ‘पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड २०२५’ मिळाल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, राष्ट्रीय सल्लागार प्रकाश गेडाम, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा, उपाध्यक्ष भारत खटी, तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण विदर्भातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button