
गडचिरोली : नुकतीच जिल्हास्तरीय इंडोर रायफल शुटींग स्पर्धा गोंडवाना सैनिकी विद्यालयात उत्साहात पार पडली. क्रीडा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हाभरातून अनेक शुटर्सनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये सैनिकी विद्यालयाच्या कॅडेट्सनी उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य दाखवून विशेष यश संपादन केले.
१९ वयोगटात कॅडेट मास्टर मंथन शृंगारपार, आयुष नैताम व यशीत देवारे यांनी अचूक नेमबाजी सादर करत स्पर्धेत विजयी यश मिळवले. तर १७ वयोगटात कॅडेट मास्टर प्रेम वाकडीकर, विस्मय जुमनाके व वेदांत चाफले यांनीही नेमबाजीच्या कौशल्याच्या जोरावर उत्तम गुणांकन मिळवून आपले स्थान पक्के केले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल ठरत विभागस्तरीय रायफल शुटींग स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून ही स्पर्धा नागपूर येथे होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे व प्रशिक्षक तथा सैनिकी निदेशक ऋषी वंजारी यांनी समाधान व्यक्त करीत सर्व कॅडेट्सचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



