गडचिरोलीविदर्भ

ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रात गडचिरोली पर्यटन परिवर्तन महोत्सव-२०२५ साजरा

गडचिरोली : जागतिक पर्यटन दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘गडचिरोली पर्यटन परिवर्तन महोत्सवाचा 2025 चौथा दिवस 26 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ (TRICEF) नवसंशोधन केंद्रातर्फे सांस्कृतिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, गडचिरोली आणि सोबाय टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होते. या उद्देशाने आदिवासी नृत्य स्पर्धा आणि आदिवासी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. याव्यतिरिक्त, ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रातील नवउद्योजक आणि उमेदच्या बचत गटांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, साहित्य आणि इतर उत्पादनांचे प्रदर्शनी देखील भरवण्यात आले होते, ज्याला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, न.न.व सा.चे संचालक प्रा. मनिष उत्तरवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे, तसेच लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे संचालक कर्नल विक्रम मेहता यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी वृषांक सोरते, सर्व कर्मचारी आणि सोबाय टुरिझमचे संस्थापक पंकज नंदगिरीवार यांनी अथक परिश्रम घेतले. या महोत्सवाने गडचिरोलीच्या पर्यटन विकासाला आणि स्थानिक कला-संस्कृतीला एक नवी दिशा दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button