
पारदर्शकता आणि जबाबदारी जपण्याचे शासकीय कार्यालयांना निर्देश ; जिल्ह्याधिकारी कार्यालयात ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’
गडचिरोली : शासकीय कार्यालयांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे काटेकोरपणे पालन करून आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी जपावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात २९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली हा दिवस साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, “हा कायदा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा असून, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.”
यावेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.



