गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात ‘इन्कमटॅक्स नियमावली’वर एक दिवसीय कार्यशाळा

PM-USHA अंतर्गत TDS, GST नियमांसह ‘Academic Bank of Credits’ वर सखोल मार्गदर्शन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात नुकतीच ‘इन्कमटॅक्स (TDS – GST) नियमावली’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. शिक्षण आणि करव्यवस्थेतील पारदर्शकतेचा संबंध अधोरेखित करणाऱ्या या कार्यशाळेत आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नव्या सुधारणांवरही चिंतन करण्यात आले.

या कार्यशाळेचे आयोजन प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. प्रमुख वक्ते म्हणून आयुक्त, आयकर विभाग, नागपूर, विनय भट आणि इन्कमटॅक्स ऑफिसर, चंद्रपूर, सुरेश चौधरी हे होते. तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सी. ए. भास्कर पठारे आणि गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मूनघाटे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि विद्यापीठ गीताने झाली. वित्त व लेखा अधिकारी सी. ए. भास्कर पठारे यांनी प्रास्ताविक केले, तर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षण आणि करव्यवस्थेतील पारदर्शकतेचा परस्परसंबंध स्पष्ट केला.

पहिल्या सत्रात सुरेश चौधरी यांनी नागरिक सुलभ करप्रणाली व नवीन सुधारणा याविषयावर प्रकाश टाकला. यावेळी वक्त्यांचा परिचय सहा. प्रा. निखिल बांगडे, दुसऱ्या सत्रात सहा. प्रा. डॉ. स्नेहा वनकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर संयुक्त आयुक्त, आयकर विभाग, नागपूर विनय भट यांनी करप्रणालीतील न्याय्य व पारदर्शक पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत आयोजित या कार्यशाळेत “Academic Bank of Credits आणि Income Tax Reform” या दोन महत्वाच्या विषयांवर चिंतन झाले. शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्समुळे विद्यार्थ्यांना गतिशील शिक्षणाला मिळणारी गती स्पष्ट झाली, तर आयकर सुधारणांमुळे सामाजिक व आर्थिक न्याय कसा साधता येईल, हेही अधोरेखित झाले.

या कार्यशाळेचा लाभ संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन सहा. प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले, तर सहा. प्रा. राहुल गादेवार यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. समारोप राष्ट्रगीताने झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button