आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पंढरपूरमध्ये राज्य अधिवेशन

१५ व १६ नोव्हेंबर रोजी सोहळा; राज्यातील अडीच हजार पत्रकार होणार सहभागी
पंढरपूर : महाराष्ट्रातून सुरू झालेली आणि ५६ देशांपर्यंत विस्तारलेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ चे राज्य अधिवेशन यंदा पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. तब्बल ६ लाख ७० हजार पत्रकार सदस्य असलेल्या या संघटनेचे अधिवेशन शनिवार, दि. १५ आणि रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, इस्कॉन पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.
या अधिवेशनात राज्यातील अडीच हजार पत्रकारांचा सहभाग अपेक्षित असून, अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे मुख्य उद्दिष्ट पत्रकारिता अधिक सक्षम आणि अबाधित कशी राहील यावर सखोल चर्चा करणे आहे.
पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे, तसेच पत्रकारितेची गुणवत्ता आणि व्यावसायिकता उंचावणे, हे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्य कार्य आहे. अधिवेशनात पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मान्यवरांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या सक्षमीकरणावर विचारमंथन होईल.
पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही संघटना पत्रकारांसाठी जगभरात निर्माण झालेली केवळ एक सामाजिक चळवळ नसून, पत्रकारांना सक्षम करण्यासाठीचे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे.
या अधिवेशनासाठी इस्कॉनचे प्रल्हाद दास महाराज, परमात्मा दास व शंकरदास महाराज यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि राजकीय मंडळी यांना या अधिवेशनासाठी खास निमंत्रित केले आहे.



