
आमदार विजय रहांगडाले यांची प्रमुख उपस्थिती ; एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नागरिकांची तपासणी
गोंदिया : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत’ विविध ठिकाणी समाधान शिबिरे आयोजित केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गोंदिया तालुक्यातील दांडेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) एकोडी यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पटले आणि पंचायत समिती सदस्य अजाबरावजी रिनाइत उपस्थित होते.
आरोग्य शिबिरामध्ये एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी लावलेल्या जनजागृती स्टॉलमध्ये शासनाच्या विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांची आणि योजनांची माहिती नागरिकांना दिली.
या शिबिराला गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बिसेन यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



