
जिल्हाधिकारी सावनकुमार यांचे महिलांना मार्गदर्शन ; साडी निर्मिती व्यवसायाच्या विस्तारासाठी चर्चा
भंडारा : उमेद अभियानांतर्गत कोसा व्यवसाय करणाऱ्या महिलांना सशक्त करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथे जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कोसापासून साडी निर्मितीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी आणि स्थानिक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन प्रमुख महिला समूहांशी संवाद साधला. ग्रीष्मा स्वयं सहायता समूहाच्या साधना निनावे आणि इतर महिला सदस्यांशी साडी निर्मितीतील वाढीच्या संधींवर चर्चा करण्यात आली. हरित भूमी कोसा उत्पादक गटातील रेखा सोनकुसरे आणि इतर २५ महिला सदस्यांसोबत त्यांच्या व्यवसायातील प्रगती, सध्याच्या अडचणी आणि आगामी विस्ताराच्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. या संवादातून महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि कोसा साडी निर्मिती व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींवर सकारात्मक दिशा मिळाली.
यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक गौरव कुमार तुरकर, तालुका अभियान व्यवस्थापक सुनील पटले आणि प्रभाग समन्वयक संजय लव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे आंधळगाव परिसरातील कोसा व्यवसायाला आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा आधार मिळाला आहे.



