
मुख्य आरोपीला अटक, दोघे फरार ; आदर्श महाविद्यालयाजवळ पोलिसांची कारवाई
गडचिरोली : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध पुरवठा गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तंबाखू साठा, चारचाकी वाहन आणि रोख रक्कमेसह तब्बल ८ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक पूर्णपणे बंद केलेली असतानाही काही तस्करांकडून हा अवैध धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती ९ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ललीत राठी (रा. अर्जुनी मोरगाव) हा आपल्या ‘मारुती इको’ चारचाकी वाहनातून देसाईगंज भागात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूचा पुरवठा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वडसा येथील आदर्श महाविद्यालयाजवळ सापळा रचला. संशयास्पद ग्रे रंगाचे “मारुती इको” (Maruti Eeco) वाहन थांबवून त्यातून माल उतरविताना पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच एका इसमाने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र वाहनचालक ललीत गोपालदास राठी (वय ४१) पोलिसांच्या हाती लागला.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत वाहनातून हिरव्या रंगाचे “होला हुक्का शिशा तंबाखू” (१३० पॅकेट) आणि लाल रंगाचे “ईगल हुक्का तंबाखू” (१५४ पॅकेट) असा सुमारे ३ लाख ३ हजार रुपयांचा तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच, अवैध वाहतुकीसाठी वापरलेले ३ लाख रुपये किंमतीचे वाहन आणि २ लाख १९ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता-२०२३ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत गोपालदास राठी (४१) याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याचे दोन साथीदार रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) आणि इंद्रकुमार नागदेवे (रा. वडसा) हे दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि. प्रेमकुमार दांडेकर (पो.स्टे. देसाईगंज) करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, आणि गोकुल राज. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं. राजु पंचफुलीवार, आणि चापोअं. दिपक लोणारे यांचा समावेश होता.
या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. “गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायांना शरण जाणार नाही. कायदेशीर चौकट वापरून अशा सर्व तस्करीवर पोलिसांचा कठोर अंकुश राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.



