गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत १२ ऑक्टोबर रोजी विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

गडचिरोली : महाराष्ट्रावर असलेल्या प्रचंड कर्जाच्या ओझ्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला असून, या भागातील जनतेला भेडसावणाऱ्या अनुशेषावर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय आहे, या मागणीला बळ देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती, गडचिरोलीच्या वतीने ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता यमुना हॉल, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे होणार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य दहा लाख कोटींच्या कर्जाखाली दबले आहे. अशा परिस्थितीत विदर्भातील नागरिकांचे भविष्य काय? असा प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे. अनुशेष: शिक्षण, आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, वैद्यकीय शिक्षण, सिंचन आणि उद्योगांचा मोठा अनुशेष. सामाजिक समस्या: शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि रोजगारासाठी युवकांचे वाढते स्थलांतर. राज्याचे कर्ज: दहा लाख कोटींच्या कर्जामुळे विदर्भाचा विकास होण्याची शक्यता नाही.

या सर्व गंभीर प्रश्नांवर ‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हाच एकमेव पर्याय असल्याचे महत्त्व पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसंकल्प मेळाव्याचे उद्घाटन विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष सुनिल चोखारे, दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाला, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पि. आर. राजपूत, ॲड. सुरेश वानखेडे, महिला अध्यक्ष रंजनाताई मामर्डे, युवा आघाडीचे मुकेश मासुरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, घिसु खुणे, रमेश उपलवार, महिला आघाडी अध्यक्ष अमिता मडावी, डॉ. चंद्रशेखर डोंगरवार, प्रा. मुनिश्वर बोरकर, रमेश भुरसे, पांडुरंग घोटेकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संकल्प मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा आणि वेगळा विदर्भाची मागणी पुर्ण करावी, असे आवाहन दशरथ साखरे, मारोती भैसारे, प्रमोद राऊत, नाशिर शेख, महानंदा आतला, पांडुरंग नागापुरे, चंद्रकांत शिवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button