
गडचिरोली : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, ‘आत्मा’ आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या समन्वयाने भविष्यात सर्वोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
११ ऑक्टोबर रोजी शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिल्ली येथे आयोजित ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना शुभारंभ’ तसेच ‘कडधान्य आत्मनिर्भरता मिशन शुभारंभ’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, कृषी विकास अधिकारी श्रीमती किरण खोमणे, वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर आणि कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी जी. बी. गणविर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी सांगितले की, ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’ ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून देशातील १०० जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश या योजनेत करण्यात आला आहे. ही योजना २०२६ ते २०३० पर्यंत कार्यान्वित राहणार असून याअंतर्गत समग्र कृषी विकास, कडधान्य आत्मनिर्भरता, पशुपालन, मत्स्यपालन, जलसंधारण व प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यावर भर दिला जाईल. त्यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्ह्यातील शेती आणि निगडीत व्यवसायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल आणि ‘कृषी संवादिनी-२०२५’ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये हेमलता सोनटक्के (येवली), सुजाता दिवाकर पिपरे (बोदली), रोहीदास सोमाजी नैताम (बोदली), आनंदरावजी रामचंद्र कुद्रपवार (शिवनी) आणि गुलाब केशव भोयर (कासवी) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा पाटील यांनी केले, तर आभार सुचित लाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला जवळपास ३३९ शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती लावली.



