
मुक्तीपथ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : जिल्हा मुख्यालय नजीकच्या गोगाव (ता. गडचिरोली) येथे अवैध दारूविक्री हद्दपार करण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पोलिसांनी मुक्तीपथ टीमच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करत दारू पुरवठा करणाऱ्या रानमुल येथील ठोक विक्रेत्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत दुचाकी आणि दारू असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोगाव येथील विक्रेत्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोगाव गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी गाव संघटनेच्या महिला मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नातून दारू विक्रेत्याकडे दारू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुक्तीपथ टीम व पोलिसांनी पाळत ठेवली असता, रानमुल येथील विनोद कवडू गेडाम (वय २८) हा इसम गोगाव येथील सुनील प्रभाकर टेंभुर्णे या विक्रेत्यास दारू पुरवठा करत असताना मिळून आला. संबंधिताच्या दुचाकीची झडती घेतली असता, १२ हजार रुपये किमतीची ४० लिटर मोहफुलाची दारू आणि दुचाकी असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुनिराज टेंभुर्णे, सागर तोतावार, म्हशाखेत्री यांनी ही कारवाई केली. यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष देवेंद्र शेंडे, पोलिस पाटील उत्तम मुनघाटे, तमूस अध्यक्ष उंदीरवाडे, तालुका संघटक रेवनाथ मेश्राम यांच्यासह मुक्तीपथचे पदाधिकारी उपस्थित होते.
गाव संघटनेच्या महिलांनी या विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करून गाव दारूविक्रीमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी पोलीस विभागाकडे केली आहे.



