
सुधाकर कोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी प्रक्रियेवर भर ; कृष्णा गजबे यांनी केले जनजागृतीचे आवाहन
देसाईगंज : दक्षिण नामपूरचे माजी आमदार तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, देसाईगंज येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात मतदार नोंदणी आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन नोंदणीबाबत विशेष मार्गदर्शन झाले.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे म्हणाले की, “पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. नागपूर विभागातील सर्व नागरिक, ज्यांनी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी किंवा समकक्ष पदविका प्राप्त केली आहे, त्यांनी आपली नाव नोंदणी अवश्य करावी. आपल्या हक्काच्या नोंदणीसाठी ‘अर्ज क्र. १८’ या नमुन्यात तसेच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा आणि पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून द्यावा. मतदार नोंदणी ही पुन्हा एक उत्सव आहे; यात सर्वांनी सहभाग घ्यावा व लोकशाही बळकट करावी, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. ऑनलाईन नोंदणी सुलभ व पारदर्शक असून, http://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर सुविधेसह प्रक्रिया पूर्ण करता येते. युवकांनी, नवपदवीधरांनी व वरिष्ठांनी एकत्र येऊन आपल्या मतदारसंघासाठी हा अधिकार सदृढ करावा.”
यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा पदवीधर नोंदणी प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, देसाईगंज शहर नोंदणी प्रमुख मोतीलाल कुकरेजा, ग्रामीण नोंदणी प्रमुख महेश झरकर, आरमोरीचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, कुरखेडाचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कोरची तालुका अध्यक्ष सदाराम नरोठी, देसाईगंजचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, यांचेसह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार कृष्णा गजबे आढावा बैठकीत बोलताना म्हणाले की, “आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदार नोंदणीसाठी सक्रीय प्रयत्न सुरू आहेत. पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार होणे, ही आपल्या लोकशाहीसाठी महत्त्वाची पाऊल आहे. या मोहिमेअंतर्गत पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत जबाबदारीने जनजागृती करावी. आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज, कोरची, कुरखेदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणीची आवश्यकता आहे. आवश्यक कागदपत्रांसह ‘अर्ज क्र. १८’ त्वरित भरावा आणि आपल्या लोकशाहीला मजबुती द्यावी. भारतीय जनता पार्टीचे सर्व स्तरांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते या नोंदणीला पुढाकार देतील आणि मतदारसंघात शंभर टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करतील.”
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आरमोरी विधानसभा क्षेत्राची लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने, मतदार नोंदणी मोहिमेला गती मिळावी यासाठी सर्व स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.



