गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा : २९ कोटींपैकी १० कोटींची मदत थेट खात्यात जमा

जून ते सप्टेंबर २०२५ मधील नुकसानीची भरपाई ; प्रति हेक्टरी १० हजार अतिरिक्त अनुदानास मंजुरी

गडचिरोली : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी प्राप्त झालेल्या सुमारे २९ कोटी रुपयांच्या निधीपैकी १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण २१ हजार ४९५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात १५ कोटी ६३ लाख १२ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी १५ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यात रु. १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये निधी थेट जमा झाला आहे. शासनाने प्रति हेक्टरी रु. १० हजार याप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यास ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी सध्या १३ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ६२१ शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार ७ हजार ४५ हेक्टरवरील शेत पिकाचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

जमा न झालेल्या रकमेसाठी तात्काळ संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

“ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा झाली नसेल, त्यांनी विलंब न लावता तातडीने संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असल्यास किंवा बँक खाते नोंदीत नसून निधी परत गेला असल्यास, त्वरित आवश्यक कार्यवाही करून घ्यावी. निधी मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील,” असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button