
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीक्षेत्र कोरडवाहू असलेल्या या भागात निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला असताना, शासनाने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला, मात्र दिवाळीपूर्वी मदत बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने चक्क ऐन दिवाळीच्या दिवशी शेतशिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत ‘काळी दिवाळी’ साजरी करत अनोखे आंदोलन केले.
यावर्षी पर्जन्यमान १२९ टक्के अधिक झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाहून गेला, परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई जाहीर केली आणि दिवाळीत ती बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून बल्लारपूर तालुक्यातील किन्ही येथील जीवनकला आलाम यांच्या शेत बांधावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी यांनी शासनाच्या धोरणावर टीका केली. त्यांनी शेतकऱ्यांसोबत भाकर, पिठल आणि ठेचा खाऊन सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या भूमिकेचा निषेध केला. या अनोख्या आंदोलनाने सरकारचे पितळ उघडे पडले असून, वेळीच नुकसानभरपाई न दिल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अफसाना सय्यद, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश बुरांडे, ईटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरे, किन्ही येथील माजी सरपंच वासुदेव येरगुडे, जीवनकला आलाम, भास्कर माकोडे, प्राणेश अमराज, रवी देरकर, सुरेश वासाडे, शेखर आलाम, सुरेश बोप्पनवार, भास्कर कावळे, सुर्यकांत दयालवार, नाजुका आलाम, सुनील कोहरे, कैलास धानोरकर यांच्यासह शेकडो शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



