
बर्डीवरच्या वडसा टी-पॉईंटजवळील घटना ; टिप्परचालक टिप्परसह पसार
आरमोरी: येथील बर्डीवरच्या वडसा टी-पॉईंटजवळ एका भरधाव टिप्परने दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात एका युवकाला आपला जीव गमवावा लागला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टिप्परचालक टिप्परसह घटनास्थळावरून पसार झाला. हा अपघात सोमवारी (दि. २६) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घडला.
सारंग रविंद्र शेंडे (वय ३१, रा. आवळगाव, ता. ब्रह्मपुरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुचाकीवर असलेले डेव्हिड नवलू मडावी (वय ३५) आणि महेंद्र जांगधुर्वे (वय ३२, रा. येरकड, ता. धानोरा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही युवक एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न आटोपून आवळगावहून ते परत आरमोरीकडे येत असताना त्यांच्या मोपेडला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर टिप्परचालक लगेच टिप्पर घेऊन फरार झाला. आरमोरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात झालेल्या ठिकाणचा रस्ता अरुंद असल्याने येथे वारंवार अपघात होतात. त्यामुळे हा रस्ता रुंद करून तिथे रस्ता दुभाजक तयार करावा, अशी मागणी आरमोरीतील नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.



