
ब्रह्मपुरी : तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून विनयभंग, मारहाण तसेच प्रेमसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करणाऱ्या युवकाला ब्रह्मपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. २९) अटक केली. निळोबा प्रभुदास सिंगाडे (२१, रा. चिंचोली) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
आरोपी निळोबा सिंगाडे हा वर्षभरापासून पीडित मुलीचा वारंवार पाठलाग करीत होता. ‘तू माझ्याशी बोल आणि प्रेमसंबंध ठेव,’ असा दबाव टाकत होता. सततच्या त्रासामुळे पीडित मुलीने काही दिवस शाळेत जाणे बंद केले होते. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास आरोपी हा मुलीच्या घरात शिरला. त्याने मुलीचा हात धरून बाहेर ओढले. गालावर चापट मारून जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या आईने विरोध केल्यावर आरोपीने शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला. पीडित मुलीच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. २९) आरोपी निळोबा सिंगाडे याला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७८, ३३२ (सी), ११५, ३५२, ३५१ (३) तसेच पॉक्सो कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे करीत आहेत.



