
अडपल्ली येथील घटना; आरोपी मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
गडचिरोली : दारूच्या नशेत असलेल्या वडील आणि मुलगा यांच्यात गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या वडिलांच्या गळ्यावर आणि डोक्यावर विळ्याने वार केले, यात वडील गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील अडपल्ली येथे घडली.
रमन झिटू मंगर (वय ५०) असे जखमी वडिलांचे नाव असून, रुतिक रमन मंगर (वय २४) असे आरोपी मुलाचे नाव आहे. रमन यांची पत्नी दोन वर्षांपूर्वी मरण पावल्याने रमन आणि रुतिक हे दोघेच अडपल्ली येथे राहत होते. रमन हे ट्रॅक्टर चालक आहेत. घटनेच्या वेळी रमन आणि रुतिक हे दोघेही दारूच्या नशेत होते. त्यांच्यात वाद सुरू असताना रुतिकचा राग अनावर झाला. रुतिकने सर्वप्रथम वडील रमन यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्याने विळ्याने रमन यांच्या डोक्यावर तीन ते चार ठिकाणी आणि गळ्यावर वार केले. यात रमन गंभीर जखमी झाले.
शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत मुलाला पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी रमन यांना रुग्णालयात भरती केले, तर आरोपी रुतिकला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.



