जळगावमहाराष्ट्र

जिल्हा बँक भरती आता ‘ऑनलाईन’ आणि पारदर्शक ; संचालकांच्या मर्जीला शासनाने घातला आवर

तीन संस्थांच्या माध्यमातून होणार भरती

जळगाव : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये (DCC Bank) होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि संचालकांच्या मर्जीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया शासनाने शिफारस केलेल्या तीनपैकी एका संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागणार आहे, असा आदेश सहकार विभागाने जारी केला आहे.

बँकांचे हित जपण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना संधी देण्यासाठी या भरती प्रक्रियेत स्थानिक जिल्ह्यांतील ७० टक्के उमेदवारांना सामावून घेतले जाईल. तर उर्वरित ३० टक्के उमेदवार हे अन्य जिल्ह्यातील असतील.

जळगाव बँकेतील वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

जळगाव जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांना वगळल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. मागील काळातही जळगाव जिल्हा बँकेतील नोकर भरतीवरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. बँकेचे संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी शासनाकडून नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत ही प्रक्रिया करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, सहकार विभागाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यात ३१ जिल्हा बँका असून काही बँकांवर प्रशासक नेमलेले आहेत. या बँकांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ जिल्हा बँकेत १३३ रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर जळगाव २२०, ठाणे १२३ आणि राज्य सहकारी बँकेत १६७ रिक्त पदे आहेत.

भरती प्रक्रियेसाठी सहकार विभागाने तीन संस्थांची शिफारस केली आहे. त्यात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस), टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेस (टीसीएस) व महाराष्ट्र नॉलेज कापरिशन लिमिटेड (एमकेसीएल) या संस्थांचा समावेश आहे. या प्राधिकृत केलेल्या तीनपैकी एका संस्थेमार्फतच ही नोकर भरतीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button