
गडचिरोली/चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची जिल्हा चंद्रपूर ग्रामीण व जिल्हा चंद्रपूर शहर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी भाजप जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून आमदार देवराव भोंगळे व आमदार किशोर जोरगेवार यांचीही नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केली.
या नियुक्तीची घोषणा होताच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, पक्षाच्या विजयासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
माजी खा. डॉ. नेते यांनी या अत्यंत जबाबदारीच्या पदावर आपली निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आमदार सुधिर मुनगंटीवार व डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
आपल्या भावना व्यक्त करताना माजी खा. डॉ. नेते म्हणाले, “पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सहकार्याने आणि जनतेच्या ठाम विश्वासाच्या बळावर, चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच विजयाचा झेंडा फडकवेल.” यासोबतच भाजपा पक्षाने दिलेली प्रामाणिकपणे जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास व्यक्त केला.
माजी खा. डॉ. नेते यांच्या या नियुक्तीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत पक्षसंघटनेला एक सक्षम, अनुभवी व प्रेरणादायी नेतृत्व लाभले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि विजयाची नवी ऊर्जा ओसंडून वाहत आहे.



