
बाजार समितीत तोट्यात धान विक्री करण्याची वेळ ; जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच केंद्र सुरू करण्याची ग्वाही
देसाईगंज : सध्या गडचिरोली जिल्ह्यात धान कापणीचे काम मोठ्या गतीने सुरू आहे, अनेक शेतकऱ्यांची कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही सुरू न झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजार समित्यांमध्ये धानाला अपेक्षित आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर तोट्याने धान विकण्याची वेळ येत आहे.
या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांची भेट घेऊन शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांची व्यथा आणि सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेतल्यानंतर माजी आमदार गजबे यांनी त्वरित जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे निवेदनाद्वारे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.
“शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देऊ नका. सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीतच प्रत्येक शेतकऱ्याचे धान खरेदी झाले पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांचे हित जपण्याचे सूचित केले.
माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी येत्या काही दिवसांत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाला न्याय्य दर मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध खरेदी-विक्री सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



