
भंडारा : बोथली येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खाली करून स्वगावी पारडीकडे परत जात असलेल्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उमेश धर्मपाल किरसान (वय ३५, रा. पारडी, ता. लाखांदूर) असे मृत चालकाचे नाव आहे. बोथली ते बारव्हा मुख्य रस्त्यावर सुनीता सूर्यवंशी यांच्या शेताजवळ सोमवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
पारडी येथील पोलिस पाटील मनोज हुकरे यांच्या मालकीचे ‘मेशी एमएच ३५ जी. ८७७२’ क्रमांकाचे ट्रॅक्टर घटनेच्या दिवशी सकाळीच बोथली येथील धान खरेदी केंद्रावर धान घेऊन गेले होते. धान्याचे पोते खाली करून ट्रॅक्टर चालक उमेश किरसान हे ट्रॅक्टर घेऊन बोथलीवरून पारडीकडे परत येत होते. याच दरम्यान, बारव्हाकडून बोथलीकडे जाणाऱ्या महिला मजुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला शेतकऱ्याने काढून ठेवलेल्या दगडांवरून ट्रॅक्टर गेल्याने हा अपघात झाला आणि ट्रॅक्टर उलटले, ज्यात उमेश किरसान यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एका महिला शेतकऱ्याने शेतातील मोठे दगड काढून ऐन मुख्य रस्त्याच्या कडेला ठेवलेले आहेत. या दगडांमुळे यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले असल्याची माहिती नागरिकांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने या दुर्लक्षित दगडांच्या विल्हेवाटीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “वेळेत या दगडांची विल्हेवाट लावून रस्ता मोकळा केला असता, तर एका निष्पाप जीवाचा बळी गेला नसता,” असे नागरिकांनी म्हटले आहे. या गंभीर दुर्लक्षाबद्दल दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.



