
मुक्तिपथच्या मागणीनुसार विविध तालुक्यांमध्ये गाव पातळीवर शिबिरे ; दारूचे व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांना आपल्या गावातच व्यसनमुक्तीचे उपचार मिळावेत, यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ संस्थेतर्फे संबंधित गावांमध्ये सातत्याने व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांच्या माध्यमातून एकूण ६६ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले. दारूचे व्यसन सोडण्यासाठी उपचार घेणे किती आवश्यक आहे, हे रुग्णांना समुपदेशनाद्वारे पटवून देण्यात आले.
मुक्तिपथने आरमोरी, गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, अहेरी आणि भामरागड या तालुक्यांच्या दुर्गम भागांत शिबिरे घेऊन अनेक रुग्णांना व्यसनमुक्त होण्यास मदत केली आहे. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे एकदिवसीय शिबिरात ११ रुग्णांनी उपचार घेतला. गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथे ११ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. धानोरा तालुक्यातील गट्टा येथे ६ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. मुलचेरा तालुक्यातील अडंगेपल्ली येथे बिरसा मुंडा जयंतीच्या औचित्याने आयोजित शिबिरात ११ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. या शिबिरांमध्ये साईनाथ मोहुर्ले यांनी समुपदेशन केले. अहेरी तालुक्यातील रसपल्ली येथे एकदिवसीय शिबिरात ८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. भामरागड तालुक्यातील कारामपाल्ली येथे आयोजित शिबिरातून सर्वाधिक १९ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरांमध्ये पूजा येलूरकर यांनी रुग्णांचे समुपदेशन केले.
या सर्व शिबिरांमध्ये समुपदेशक, संयोजक, प्रेरक आणि मुक्तिपथ तालुका संघटक यांनी समन्वयाने काम करत रुग्णांची केस हिस्ट्री घेतली आणि त्यांना व्यसनाचे धोक्याचे घटक समजावून सांगितले.



