गडचिरोलीविदर्भ

भामरागड शहराला दारू व तंबाखू विक्रीमुक्त करण्याचा नगरपंचायतीचा निर्धार

नगराध्यक्ष रामबाई माहाका यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत नियोजन ; वार्ड संघटना आणि ‘मुक्तिपथ‘ टीम घेणार पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड शहराला अवैध दारू आणि तंबाखूविक्रीपासून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भामरागड नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष रामबाई माहाका यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा करून कृती योजना आखण्यात आली. शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी सर्व वार्डातील नगरसेवक आणि ‘मुक्तिपथ’ टीम पुढाकार घेणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले.

बैठकीत भामरागड शहरातील अवैध दारूविक्री आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी शहर संघटनेची पुनर्बांधणी करून ती सक्रिय करणे आणि प्रत्येक वार्डांमध्ये वार्ड संघटना गठीत करणे. नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अवैध दारू विक्रीबंदीचा ठराव पारित करणे. दारू व खर्रा व्यसन आटोक्यात आणण्यासाठी भिंती चित्रांद्वारे जनजागृती करणे. ३१ डिसेंबरला ‘दारूला नाही म्हणा’ आणि ‘नवीन वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा’ असे उपक्रम राबवत भव्य जनजागृती रॅलीचे नियोजन नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमांमध्ये पोलीस विभाग, आरोग्य विभाग, मुक्तिपथ अभियान भामरागड आणि शहरातील सर्व शाळा-विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असेल.

यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिजीत सोनवने, उपाध्यक्ष विष्णु मडावी, नगरसेवक सरजु सडमे आणि मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहराला दारूविक्रीमुक्त शहराची ओळख मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button