गोंदियाविदर्भ

शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी शिबीर

मोबाइल कॅंसर व्हॅनद्वारे १२४ लाभार्थ्यांनी केली तपासणी ; वेळेत निदान व मोफत उपचारासाठी शासनाचा पुढाकार

गोंदिया : कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे आणि नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गोंदिया जिल्ह्यात सुरू केलेल्या मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅनद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडा येथे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचा १२४ लाभार्थ्यांनी फायदा घेतला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी माहिती दिली की, सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ ऑगस्टपासून गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील ३२ आरोग्य संस्थांतील गावांमध्ये मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅनद्वारे महिला आणि पुरुषांची मोफत तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ही व्हॅन ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची तपासणी करत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडा येथे झालेल्या शिबिरात एकूण १२४ लाभार्थ्यांनी आपली तपासणी केली. त्यात: ५४ मुख कर्करोगाचे रुग्ण, ४७ महिलांची स्तन कर्करोगाची तपासणी, २३ महिलांची गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यात आली. मोबाईल कर्करोग व्हॅनमध्ये कर्करोगाच्या तिन्ही प्रकारच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली प्रगत यंत्रणा उपलब्ध आहे, ज्यात डेंटल चेअर, प्रगत स्तन तपासणी यंत्रणा आणि कोल्पोस्कोप यंत्राचा समावेश आहे.

शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. धवल सावंत, मुखरोग तज्ज्ञ डॉ. शाम भोयर आणि शल्यचिकित्सक डॉ. अतुल डोकरीमारे यांनी लाभार्थ्यांची तपासणी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button