गडचिरोलीविदर्भ

वाघाच्या बंदोबस्तासाठी देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन; दोन तास वाहतूक ठप्प

गडचिरोली : इंजेवारी–देऊळगाव परिसरात वाढत्या वाघहल्ल्यांमुळे निरपराध नागरिकांचे जीव जात असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 06) देऊळगाव येथे ठिय्या व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना वाघांपासून संरक्षण द्यावे तसेच रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

गेल्या २० दिवसांत परिसरात वाघांच्या हल्ल्यांत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने भीतीचं सावट अधिक दाटले आहे. वारंवारच्या हल्ल्यानंतरही वन विभाग व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात आरमोरी–गडचिरोली मार्गावरील देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार, सागर वाढई, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक, आजाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, सोनाशी लभाने यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.

संतप्त नागरिकांनी तब्बल दोन तास वाहतूक ठप्प करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी त्वरित वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी प्रशासनाकडे जोरदारपणे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button