गडचिरोलीविदर्भ

खर्रा-तंबाखू विक्रीविरोधात शाळकरी विद्यार्थ्यांची अनोखी मोहीम

“काका, खर्रा विकणे बंद करा!”, विद्यार्थ्यांची भावनिक साद ; भामरागड जि. प. समूह निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांची कृती

गडचिरोली : भामरागड येथील जिल्हा परिषद समूह निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या १०० यार्ड परिसरामध्ये खुलेआम सुरू असलेल्या खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री विरोधात एक अत्यंत अनोखी आणि भावनिक मोहीम राबवली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या हानिकारक पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करत, दुकानदारांना शाळा परिसरात विक्री न करण्याची कळकळीची विनंती केली.

शाळेच्या परिसरात मोठ्या जोमाने सुरू असलेल्या खर्रा विक्रीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एकत्रित भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी खर्रा विक्रेत्यांना पुष्पगुच्छ देऊन, अत्यंत भावनिक साद घातली. “काका, शाळेच्या परिसरात खर्रा, तंबाखू विकणे बंद करा. नाहीतर आम्हा विद्यार्थ्यांना कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही यासाठी तुम्हाला विनंती करतो.” विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आणि निरागस पद्धतीमुळे उपस्थित नागरिकांचे मन हेलावले.

या भावनिक विनंतीनंतर विद्यार्थ्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम स्पष्ट करणाऱ्या घोषणा देत गावात रॅली काढून जनजागृती केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांनाही तंबाखूमुक्त जीवनाचा संदेश दिला. “तंबाखू खाशील का बाप्पा?, नाही रे बाप्पा, नाही रे बाप्पा!”, “खर्रा, तंबाखू खाशील का भाऊ? नाही रे भाऊ, नाही रे भाऊ!”, “एक दो – एक दो खर्रा, तंबाखू को फेंक दो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या रॅलीत शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला उसेंडी, शिक्षिका रंजिता घातभाधे, शिक्षक ईश्वर शेंडे, प्रदीप पाऊलझगडे, नलिनी भोयर, स्वाती दळवळकर, आर. सी. मज्जी वाचामी तसेच मुक्तिपथ संस्थेचे सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button