नागपूरविदर्भ

आयटीआय निदेशकांच्या मागण्यांवर अप्पर मुख्य सचिवांसोबत सकारात्मक चर्चा, समस्या सोडवण्याचे आश्वासन

शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या मध्यस्थीने नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक; १३ मागण्यांवर कालमर्यादेत कार्यवाहीचे निर्देश

नागपूर : महाराष्ट्र राज्य आयटीआय (ITI) निदेशक संघटनेने १२ डिसेंबर रोजी पुकारलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या विशेष पुढाकाराने १० डिसेंबर रोजी मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, ज्यामुळे आयटीआय निदेशकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत ही बैठक यशस्वीरित्या पार पडली. बैठकीला नागपूर विभागाचे पदवीधर आमदार अभिजित वंजारी, संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, उपसचिव मठपती, सहसंचालक सूर्यवंशी, गावित साहेब (ऑनलाइन) उपस्थित होते.

संघटनेने शासनास दिलेल्या पत्रातील सर्वच्या सर्व तेराही मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी प्रत्येक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून, संघटना, संचालनालय आणि मंत्रालय स्तरावर समस्या निवारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि त्या उपाययोजना पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आमदार सुधाकर अडबाले आणि आमदार अभिजित वंजारी यांनी संघटनेची न्यायिक बाजू प्रभावीपणे मांडली. अप्पर मुख्य सचिवांनी प्रशिक्षण योजनांमधील सुधारणा आणि प्रशिक्षणार्थी कल्याण या विषयावर स्वतंत्रपणे समर्पित बैठक आयोजित करण्याची तयारी दर्शवली, ज्याला संघटनेनेही त्वरित होकार दिला.

अप्पर मुख्य सचिवांनी अनेक समस्या निवारणार्थ निर्णय घेतल्याचे आणि त्यादृष्टीने गतीने पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिल्याने संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी त्यांचे मागील वर्षभरातील कार्याचा आढावा घेणारे “सुधाकरपर्व” हे पुस्तक अप्पर मुख्य सचिव वर्मा यांना भेट दिले.

यावेळी माजी सरचिटणीस भोजराज काळे, माजी सरचिटणीस दुर्गपुरोहित, अमरावती शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, राज्य अध्यक्ष विनोद पाटील, राज्य सरचिटणीस राजेश खडबडे, राज्य उपाध्यक्ष संजयकुमार खर्चे, राज्य सहचिटणीस शिवाजी ढुमने, राज्य सहचिटणीस मंगेश पुंडकर, राज्य खजिनदार प्रवीण वाइनदेशकर, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव गुडधे, राज्याच्या महिला सदस्य  शर्मिला कळमकर, नागपूर विभागाचे प्रेमकुमार भैसारे, पुणे विभागाचे अध्यक्ष नेताजी दिसले, अमरावती विभागाचे राहुल चौधरी, नागपूर विभागाचे सचिव सचिन मालिचकर, सचिव सिद्धार्थ मेहरे, धीरज सव्वालाखे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button