
सेवानिवृत्त सुभेदार हरिप्रसाद ध्यानी यांचे मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि करिअर संधींबाबत जागरूकता
गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा, देशरक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील करिअर संधींबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात संरक्षणशास्त्र या विषयावर विद्यार्थी व शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे होते, तर पर्यवेक्षक अजय वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महार रेजिमेंट सेंटर, सागर (मध्यप्रदेश) येथील सेवानिवृत्त सुभेदार हरिप्रसाद ध्यानी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मार्गदर्शक ध्यानी यांनी भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलाची रचना, राष्ट्रीय सुरक्षा, आधुनिक युद्धतंत्र, तसेच एनसीसी (NCC), एनडीए (NDA), सीडीएस (CDS) आणि सैन्य भरती प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ध्यानी यांनी संरक्षणशास्त्र विषयाचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना शिस्त, देशभक्ती व राष्ट्रसेवेची भावना अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना संरक्षण क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन एनसीसीचे ए. ओ. रहीम पटेल यांनी केले, तर एनडीए विषयाचे प्रमुख गजानन ढोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.



