गडचिरोलीविदर्भ

दारूविक्री समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस पाटलांनी पुढाकार घ्यावा

नाईकवाडी यांचे आवाहन ; मालेवाडा पोलिस मदत केंद्रात समन्वय बैठक

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्र येथे प्रभारी पोलिस अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक) आकाश नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ‘मुक्तिपथ व पोलिस विभाग समन्वय बैठक’ आणि पोलिस पाटील कार्यशाळा घेण्यात आली. गावपातळीवरील अवैध दारूविक्री समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस पाटील यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रभारी पोलिस अधिकारी नाईकवाडी यांनी केले. या कार्यशाळेत पोलिस स्टेशन अंतर्गत आरमोरी, कुरखेडा, आणि धानोरा या तीन तालुक्यातील एकूण ३८ पोलिस पाटील यांनी सहभाग दर्शविला.

गावातील अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिस पाटलांनी पुढाकार घ्यावा. दारूविक्रेत्यांची माहिती तात्काळ पोलिस विभाग व मुक्तिपथ टीमला द्यावी. गावांमध्ये होणाऱ्या विविध कृती कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुढाकार घ्यावा. गाव संघटना, मुक्तिपथ आणि शक्तिपथ स्त्री संघटनांना सक्रिय करणे व त्यांची स्थापना करण्यासाठी मदत करावी. दारूची मागणी कमी करण्यासाठी व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करावे. दारूचा पुरवठा थांबवण्यासाठी पोलिस पाटील यांनी पोलिस विभाग आणि मुक्तिपथ तालुका टीमची मदत घ्यावी. आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. मुक्तिपथ तालुका संघटक आरमोरीचे विनोद एल. कोहपरे, प्रभारी संघटक कुरखेडाच्या शारदा मेश्राम, उपसंघटक धानोराचे भास्कर कड्यामी यांनी अधिकार, कायद्यांची माहिती देत अवैध व्यवसायांवर आळा घालण्याचे आवाहन पोलिस पाटील यांना केले. दरम्यान, जनजागृतीपर गाणे सादर करून प्रेरक जीवन दहीकर (कुरखेडा) यांनी पोलिस पाटील यांचे मनोबल वाढविले. यावेळी उषा गावडे (प्रेरक, धानोरा), शुभम कलोडे, आणि अतुल पोरटे हे ‘स्पार्क’ विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button