
अहेरी तालुक्यातील येदरंगा येथील घटना
अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेत १० वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रीकांत विकास मडावी (रा. येदरंगा, ता. अहेरी) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, ही घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी त्याच्या राहत्या घरी घडली.
श्रीकांत मडावी हा जिमलगट्टा येथील आश्रमशाळेत १० व्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याने १६ आणि १७ डिसेंबर अशी दोन दिवसांची रजा अर्जाद्वारे मंजूर करून घेतली होती आणि तो आपल्या गावी येदरंगा येथे गेला होता. गुरुवारी तो पुन्हा शाळेत परतणार होता, मात्र त्याआधीच काळानं त्याच्यावर झडप घातली. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास श्रीकांत घरात टॉर्च चार्ज करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी चार्जिंगची पिन थेट इलेक्ट्रिक बोर्डमध्ये न लावता त्याने सोलर इन्व्हर्टरला जोडली. यामुळे त्याला विजेचा भीषण धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच जिमलगट्टा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र कावळे आणि शिक्षक कर्मचारी येदरंगा येथे पोहोचले. त्यांनी मडावी कुटुंबाचे सांत्वन केले आणि तातडीची आर्थिक मदत देऊन कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर मृतदेह हलविण्यासाठी कुटुंबाकडे रुग्णवाहिकेचे पैसे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. अशा कठीण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय गज्जलवार यांनी पुढाकार घेऊन मदत केली.



