‘पाणी नाही तर रस्ता नाही!’ ; साखेरा येथे संतप्त ग्रामस्थांचे बांधकाम रोको आंदोलन

रस्ता कामात पाणीपुरवठा वाहिन्यांची तोडफोड; कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे धानोरा तालुक्यातील नागरिक आक्रमक
धानोरा : “आधी पाणी द्या, मगच रस्ता करा,” अशी ठाम भूमिका घेत धानोरा तालुक्यातील साखेरा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (१८ डिसेंबर) सुरू असलेले काँक्रीट रस्त्याचे बांधकाम रोखून धरले. रस्ता बांधकामादरम्यान नळ पाणीपुरवठा योजनेच्या वितरण नलिकांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हे ‘बांधकाम रोको’ आंदोलन छेडले.
साखेरा येथे MSRDC मार्फत मे. गुरुबक्षानी (गडचिरोली) यांच्याद्वारे काँक्रीट रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करत असताना गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य वितरण नलिका फुटल्या. यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ही बाब वारंवार संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र, कोणतीही दुरुस्ती किंवा पर्यायी पाण्याची व्यवस्था न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने शेवटी ग्रामस्थांनी थेट रस्ता बांधकामस्थळी धाव घेऊन काम बंद पाडले.
या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. “अन्याय सहन करणार नाही,” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी कंत्राटदाराला धारेवर धरले. यावेळी अनिलराव दळांजे (सरपंच), तानुजी पोटावी (उपसरपंच), माधुरी उसेंडी, संगिता कटकेवार (ग्रामपंचायत सदस्य), लक्ष्मण वडे (ग्रामसभा अध्यक्ष), भागरताबाई कुमोटी, सुंदराबाई गावळे (तंटामुक्त समिती सदस्य) आदी उपस्थित होते.
दरम्यान कंत्राटदार मे. गुरुबक्षानीचे एमडी निंबोरकर यांच्याशी ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. या सकारात्मक चर्चेनंतर ग्रामस्थांनी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे.
नळ पाणीपुरवठा वितरण नलिका तात्काळ दुरुस्त न झाल्यास आणि गावात पाणी न पोहोचल्यास, यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा साखेरावासीयांनी प्रशासनाला दिला आहे.



