गोंदियाविदर्भ

सडक अर्जुनी येथे ‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’चा दिमाखदार शुभारंभ; ‘पावा’ यांच्या सुरावलींनी रसिक मंत्रमुग्ध!

१५० हून अधिक कलावंतांचा सहभाग; लोकसंस्कृतीच्या जतनासाठी आ. राजकुमार बडोले यांचा स्तुत्य उपक्रम

गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भारतीय लोकसंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य ‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’चा शुक्रवारी सडक अर्जुनी येथे उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रसिद्ध कलावंत ‘पावा’ यांचा ‘लाईव्ह म्युझिक आणि मेडिटेशन’चा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्याने उपस्थित हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या महोत्सवात गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील १५० पेक्षा अधिक नामवंत कलावंत सहभागी होत आहेत. महोत्सवाच्या आगामी दिवसांत नृत्य, संगीत, कीर्तन आणि विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. पहिल्या दिवशी ‘पावा’ यांच्या संगीताने वातावरणात एक आगळीच प्रसन्नता निर्माण केली, ज्याचा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद लुटला.

या सोहळ्याला आमदार संजय पुराम (आमगाव-देवरी विधानसभा), वीरेंद्र अंजनकर (भाजप भंडारा-गोंदिया समन्वयक), प्रेमजी रहांगडाले (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष), सीता रहांगडाले (भाजप जिल्हाध्यक्ष), सुरेंद्र नायडू (शिवसेना जिल्हाध्यक्ष), डॉ. लक्ष्मण भगत (जि.प. सभापती), यशवंत गणवीर (माजी जि.प. उपाध्यक्ष), चेतन वळगाये (पं.स. सभापती), शारदा बडोले (संचालिका, कृ.उ.बा.स.), डक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, दोन्ही तालुक्यांतील महायुतीचे पदाधिकारी आणि आयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राजकुमार बडोले यांनी या महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “आपल्या मातीतील कला आणि संस्कृती समृद्ध आहे. ग्रामीण भागातील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी मोठ्या व्यासपीठाची गरज असते, तोच प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून केला जात आहे.”

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत असून, येत्या काही दिवसांत सडक अर्जुनीकरांना दर्जेदार सांस्कृतिक मेजवानी अनुभवता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button