गडचिरोलीविदर्भ

लक्ष्मीनगरातील समस्या सोडविणार – नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर

तलावाचे पाणी व अर्धवट रस्त्यांचा नागरिकांना मनस्ताप ; प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन जाणून घेतल्या व्यथा

गडचिरोली : नवनियुक्त नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी बुधवारी (३१ डिसेंबर) आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगर भागाला भेट दिली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला वॉर्डातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी प्रलंबित समस्यांचा आढावा घेतला आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

लक्ष्मीनगरवासीयांनी नगराध्यक्षांसमोर समस्यांचा पाढा वाचताना आरमोरी रोडवरील तलावाचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. तलावाचे पाणी चुकीच्या पद्धतीने आणि अनधिकृतरित्या वारंवार सोडले जात असल्याने ते पाणी थेट नागरिकांच्या प्लॉट्समध्ये आणि घरात शिरते. यामुळे मालमत्तेचे नुकसान होत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठा: नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने महिलांची गैरसोय होत आहे. पायाभूत सुविधा: सी.सी. रोडचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे. सांडपाणी व्यवस्था: नाल्यांचे बांधकाम अपूर्ण असल्याने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास अडचण येत आहे. विद्युत व्यवस्था: वॉर्डातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी असुरक्षिततेचे वातावरण असते. लवकरात लवकर या समस्या सोडविल्या जाव्या अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी केली.

नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर ॲड. प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, “शहराचा विकास हाच माझा संकल्प असून लक्ष्मीनगरातील सांडपाणी आणि रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून विशेष नियोजन केले जाईल.” यावेळी वॉर्डातील नागरिकांनी नगराध्यक्षांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक हर्षल गेडाम, सागर निंबोरकर, राहुल निलमवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समस्या मांडताना वेदप्रकाश कोल्हे, सुधीर शेंडे, राकेश माटेटवार, भास्कर ठाकरे, हिराजी धारणे, रजनीश कोल्हे, गणेश आखाडे, रूपाली कोल्हे, गीता माटेटवार, स्नेहा शेंडे यांच्यासह पवन धाईत, नरेश गुमडेलवार, स्वप्नील कायरकर, निलिमा जनबंधू, डॉ. श्याम खंडारे आणि लक्ष्मीनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button