गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

सावध रहा! संक्रांतीचा आनंद विरजणात पडू देऊ नका; पतंग उडवताना ‘वीज सुरक्षे’कडे दुर्लक्ष ठरू शकते जीवघेणे

नायलॉन मांजा आणि विजेच्या तारांचे घातक समीकरण ; महावितरणचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

चंद्रपूर : मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून आकाशात रंगीबेरंगी पतंगांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पतंग उडवण्याचा हा उत्साह साजरा करताना ‘वीज सुरक्षा’ या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. दरवर्षी पतंग उडवताना विजेचा धक्का लागून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, महावितरण आणि सामाजिक संस्थांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा चिनी मांजा हा विजेचा सुवाहक असतो. या मांजावर धातूच्या कणांचे कोटिंग असते. जेव्हा हा मांजा उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांना (High Tension Lines) स्पर्श करतो, तेव्हा मांजा धरणाऱ्या व्यक्तीला जोरदार विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे केवळ सुती धाग्याचाच वापर करणे अनिवार्य आहे.

या चुका टाळा, सुरक्षित राहा!

तारांमध्ये अडकलेला पतंग: विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी लोखंडी सळई, ओले बांबू किंवा लाकडाचा वापर कधीही करू नका. यामुळे ‘शॉर्ट सर्किट’ होऊन मोठा स्फोट होऊ शकतो. ट्रान्सफॉर्मरपासून लांब राहा: डीपी किंवा ट्रान्सफॉर्मरच्या (रोहित्राच्या) जवळ उभे राहून पतंग उडवू नका. तेथे होणारे स्पार्किंग गंभीर इजा पोहोचवू शकते. वीज पुरवठा खंडित होणे: तारांमध्ये मांजा अडकल्यामुळे ‘ट्रिपिंग’ होऊन संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होतो, ज्याचा फटका हजारो ग्राहकांना बसतो.

सुरक्षित पतंगोत्सवासाठी ‘या‘ नियमांचे पालन करा: मोकळ्या मैदानात किंवा सुरक्षित छतावर पतंग उडवा; वीज वाहिन्या, खांब आणि ट्रान्सफॉर्मर जवळ पतंग उडवू नका. केवळ सुती धाग्याचा (साध्या मांजाचा) वापर करा; नायलॉन, प्लास्टिक किंवा धातू मिश्रित मांजा वापरू नका. पतंग तारांमध्ये अडकल्यास तो तसाच सोडून द्या.; अडकलेला पतंग काढण्यासाठी ओल्या वस्तू किंवा तारांचा वापर करू नका. लहान मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे; धावत्या रस्त्यावर किंवा विजेच्या तारांखाली पतंग पकडण्यासाठी धावू नका.

“पतंग उडवणे हा आनंदाचा सण आहे, पण सुरक्षेशी तडजोड नको. आपल्या मुलांच्या हातात मांजा देताना तो विजेच्या संपर्कात येणार नाही, याची पालकांनी खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत विजेच्या तारांवरील पतंग काढण्याचा धाडसी प्रयत्न करू नये,” असे आवाहन महावितरण प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

विजेच्या तारांखाली पतंग उडवणे केवळ आपल्यासाठीच नाही, तर दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या संक्रांतीला ‘सुरक्षितता’ हीच खरी भेट ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button