गडचिरोलीविदर्भ

नऊ वर्षांपासून दारुविक्रीबंदीचा यशस्वी लढा ; महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गावाची मोठी झेप

गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या भामरागड तालुक्यातील मुरुमभुसी गावाने संपूर्ण तालुक्यासमोर एक आदर्श घालून दिला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून या गावाने एकजुटीने दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली असून, आज हे गाव ‘दारूविक्री मुक्त गाव’ म्हणून ओळखले जात आहे.

भामरागड तालुक्यापासून ईशान्य दिशेला असलेल्या या गावाची लोकसंख्या केवळ १५५ असून येथे २२ घरे आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर हे गाव वसलेले असून, नदी ओलांडली की छत्तीसगडचा बस्तर जिल्हा लागतो. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या या गावातील लोक संवादासाठी माडिया गोंडी, मराठी आणि छत्तीसगडी भाषेचा वापर करतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यासोबतच उदरनिर्वाहासाठी लोक वनउपजावर अवलंबून आहेत. कोठी ग्रामपंचायती अंतर्गत येणारे हे गाव सोयीसुविधांच्या बाबतीत आजही संघर्ष करत आहे. ग्रामपंचायत ६ ते ७ कि.मी. अंतरावर असून जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दळणवळणासाठी प्रामुख्याने मोटरसायकलचा वापर होतो, तर गरीब कुटुंबांना आजही पायदळ प्रवास करावा लागतो. गावातील लहान मुले स्थानिक शाळेत शिक्षण घेतात, तर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते.

गावातील गायता, प्रेरमा, भुम्या, पुजारी, ग्रामसभा, वनहक्क समिती आणि गाव संघटनेने एकत्र येत नऊ वर्षांपूर्वी दारू विक्री बंदीचा ठराव पारित केला होता. या मोहिमेला ‘मुक्तीपथ अभियान’ आणि स्थानिक आशा वर्करचे मोठे सहकार्य लाभले. गावातील ज्येष्ठ नागरिक देवा मट्टामी आणि विन्नु वड्डे यांनी सांगितले की, “पूर्वी दारूमुळे अनेक समस्या होत्या, पण ठराव केल्यापासून गावात विक्री पूर्णपणे बंद आहे. केवळ पूजापाठ, लग्न, बारसे किंवा अंत्यविधी अशा सांस्कृतिक परंपरांच्या वेळीच मर्यादित प्रमाणात वापर होतो, मात्र व्यावसायिक विक्रीला गावात अजिबात थारा नाही.” या छोट्याशा गावाने अवैध दारूविक्रीमुळे निर्माण झालेले दुष्परिणाम लक्षात घेऊन मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर अवैध दारूविक्रीला हद्दपार केले. दुर्गम भागात राहूनही मुरुमभुसीच्या ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा जो आदर्श ठेवला आहे, तो कौतुकास्पद आहे. यामुळे गावातील आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. या गावापासून आदर्श घेत इतरही गावांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुक्तीपथने केले आहे.

मुक्तिपथतर्फे पाठपुरावा

गावातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुक्तीपथतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नुकतेच मुक्तीपथ अभियानाचे जिल्हा कम्युनिकेशन अधिकारी कमलकिशोर खोब्रागडे, तालुका संघटक निळा किन्नाके, राकेश ढवडे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. सोबतच दारूविक्री बंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सांगितल्या. यावेळी गावातील मानु मट्टामी, ललिता वड्डे, बुद्धू मट्टामी, राजू मट्टामी, लेबू मट्टामी आणि गाव संघटनेचे सक्रिय सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button