
तोडसा इलाका यात्रेत व्यसनमुक्तीचा जागर
गडचिरोली : ‘मुक्तीपथ’पुस्तिकेत तंबाखूचे दुष्परिणाम, खर्रा व्यसनावर होणारा अफाट खर्च आणि व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे जीवन यावर आधारित गाणी समाविष्ट आहेत. जर या गीतांमधील संदेशाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात केला, तर आपले गाव निश्चितपणे व्यसनमुक्त होऊ शकते, असे मत पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ नागरगोजे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील तोडसा पट्टी इलाका येथील ४२ गावांच्या पारंपारिक तीन दिवसीय यात्रेचे आयोजन १० ते १२ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या यात्रेचे औचित्य साधून, नागरिकांनी आणि गावांनी व्यसनमुक्त व्हावे या उद्देशाने मुक्तीपथच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तोडसा येथील यात्रेत ४२ गावातील पोलीस पाटील, गाव पाटील आणि भूमय्या यांना ‘मुक्तीपथ’ गीत पुस्तिकेचे वाटप प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मोतीराम मडावी (सहाय्यक पोलीस निरीक्षक), किशोर मलेवार (मुक्तीपथ तालुका संघटक, एटापल्ली), डोलेश मडावी (इलाका अध्यक्ष), गोंगलु गावडे (इलाका पाटील) तसेच वळू आत्राम, साधू दुर्वा, केशव गावडे, सदाशिव कुळयेटी, दसा कोरामी या पोलीस पाटलांसह ४२ गावातील गाव पाटील, भूमय्या, पेरमा आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका संघटक मलेवार यांनी सांगितले की, ‘मुक्तीपथ’ या गीत पुस्तिकेत मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला आहे. तंबाखू आणि खर्रा यांसारख्या व्यसनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि आरोग्यावर होणारा विपरित परिणाम गाण्यांच्या माध्यमातून सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. हे समजून आपले गाव दारू व तंबाखूच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्तींनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



